
सत्संगाला गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना राजस्थानच्या चुरू भागात घडली आहे. ही मुलगी आपल्या आजीसोबत सत्संगाला जात होती. तेव्हा तिचं अपहरण करण्यात आलं.
ही घटना चुरू येथील दरीबा गावात घडली आहे. पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची 16 वर्षांची मुलगी आजीसोबत प्रवचनासाठी गेली होती. जेव्हा ती प्रवचन सुरू असलेल्या मंडपाबाहेर उभी होती तेव्हा त्यांच्याच गावातला एक 16 वर्षांचा मुलगा तिथे आला. त्याने तिला तिचा भाऊ बोलवत असल्याचं खोटं सांगितलं आणि तिला बाईकवर घेऊन गेला.
पुढे वाटेत या मुलाने मानकसर तलावाजवळ बाईक थांबवली. जेव्हा मुलीने त्याला भावाविषयी विचारलं तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. थोड्यावेळाने त्याचा मित्रही तिथे आला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा करू नये यासाठी दोघांनी तिला चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्या दोघांनी बाईकवरून मुलीला तिच्या घरी सोडलं. जेव्हा पीडिता घरी आली तेव्हा ती खूप घाबरली होती. तिच्या कुटुंबाने विचारल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. त्यानंतर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. एका आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.




























































