अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळे देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात उत्तर प्रदेशातही अशाच प्रकारची एक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई या जिल्यात राहणाऱ्या एका सात वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. येथील सुरसा गावातून मल्लावा गावात रात्रीच्या वेळी लग्नाची वरात आली होती. ती वरात पाहण्यासाठी गेलेली एका शेतकऱ्याची सात वर्षांची मुलगी वरातीतून बेपत्ता झाली. सर्वांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा शोध लागला नाही. पहाटे पाचच्या सुमाराला तिचा मृतदेह गावाबाहेरील झुडपात आढळल्याने एकच खळबळ उडाली. अर्धनग्न अवस्थेत असलेल्या त्या मुलीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या घटनेने गावात तणावाचं वातावरण पसरलं होतं. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरातीत दारु पिऊन झिंगलेल्या काहीं माणसांचं हे कृत्य असावं असा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.