
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी महिला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज मिताली राज हिला ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदुस्थानला या महत्त्वाच्या लढतीत इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले. यामुळे हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन व कर्णधार यांच्यावर कडाडून टीका होऊ लागली. आता मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ता हिने कर्णधार हरमनप्रीत कौरवर गंभीर आरोप केले आहेत. हरमनप्रीत कौरच्या कारस्थानामुळे मिताली राजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असे ती यावेळी स्पष्टपणे म्हणाली.
अनिशा गुप्ता हिने ट्विटरवर राग व्यक्त करताना म्हटले की, हरमनप्रीत कौर कारस्थानी, खोटे बोलणारी, अपरिपक्क्व व कर्णधारपदाला योग्य नसलेली व्यक्ती आहे. मिताली राजच्या कामगिरीत सातत्य असतानाही तिला अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातून वगळण्यात आले. सर्वात अनुभवी खेळाडूला मिळालेली वागणूक पटण्यासारखीच नाही, असेही ती पुढे म्हणाली.
एकमतानेच निर्णय – तृप्ती भट्टाचार्य, व्यवस्थापक
मिताली राजला उपांत्य सामन्यात वगळण्याचा निर्णय एकमतानेच घेतला असल्याचे संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य यांनी सांगितले. कर्णधार, प्रशिक्षक, निवड समिती यांच्यामध्ये सामन्याआधी बैठक झाली. त्यामध्ये विजयी संघामध्ये कोणताही बदल करावयाचा नाही आणि जादा गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्या यावेळी म्हणाल्या.






















































