भाजपने आमच्याविरोधात फिल्डिंग लावायचे धंदे बंद करावेत , आमदार बच्चू कडू यांचा हल्लाबोल

काँग्रेस आणि इतर पक्षांकडून जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास हा भाजपकडून होत आहे, अशी मनातील खदखद बोलून दाखवत भाजपने आमच्याविरोधात फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, अशा शब्दांत ‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी भाजपवर तोफ डागली.

आमदार बच्चू कडू यांनी अकोल्यात बोलताना आज भाजपवर गंभीर आरोप केले. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत आहे. भाजपने आपल्यासोबत उभे राहणाऱयांची फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. परंतु, भाजपकडून त्रास दिला जात आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. भाजपने कितीही त्रास दिला तरी आपण त्याची पर्वा करीत नाही. आम्हाला त्रास देण्यासाठी भाजपने आणखी दोन आमदार, तीन खासदार कामाला लावावेत, असा टोलाही बच्चू कडू यांनी भाजपला लगावला. भाजपने आम्हाला फक्त कामापुरते वापरून फेकून द्यावे असे करू नये, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. भाजपने आपल्यासोबत राहणाऱयांची फिल्डिंग लावायचे धंदे बंद करावेत. ते त्यांना परवडणार नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे.