किती वेळ घालवणार मोबाईलवर…?

>>प्रतिनिधी

बस, ट्रेन, टॅक्सी कुठेही जा… प्रत्येकाच्या हातात मोबाईल ठरलेला… आजच्या तरुणाईचं तर मोबाईलशिवाय पानही हलत नाही.

अरे, सोड तो मोबाईल… जरा अभ्यास कर… असं पालक आपल्या मुलांना कानीकपाळी ओरडून सांगत असतात, पण आजची तरुण पिढी कुठची ऐकायला… त्यांच्या हातात सदानकदा मोबाईल हॅण्डसेट असतोच. पण आता काळ हळूहळू बदलतोय. कारण तरुण वयातील जवळपास ७० टक्के मुलांना मोबाईलमध्ये वेळ घालवायला अलीकडे आवडेनासं झालंय, असा निष्कर्ष नुकताच ‘स्क्रीन एज्युकेशन’ या अमेरिकेतील एका संस्थेने काढला आहे. यातील २६ टक्के तरुणांनी स्मार्टफोनवर वाया जाणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्नही सुरू केल्याचेही संस्थेने अहवालात नमूद केले आहे.

मेसेंजिंग केल्याने टेनिस एल्बो?

आजच्या तरुणांना मोबाईल चॅटिंग करण्यापासून थांबवता येणे शक्य नाही. पण या तरुणांनी आता सावध व्हायला हवे. कारण दिवसातून अनेक तास फक्त चॅटिंग आणि मेसेंजिंग केल्यामुळे टेनिस एल्बोसारखा घातक विकार होण्याची शक्यता आहे असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. मोबाईलवर गेम खेळणाऱया तरुणांमध्ये डिकर्व्ह डेंटीनायटीस हा विकार बळावतो असेही त्यांनी नमूद केले आहे.

असा वाचवा वेळ

> कोणत्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करायचा हे आधी ठरवायला हवे. त्यामुळे मोबाईलवर नोटिफिकेशन्स नीट सेट करायला हव्यात. जेवत असाल, योगाभ्यास करत असाल किंवा झोपायला जात असाल तर नोटिफिकेशन्स येताच कामा नयेत अशीच व्यवस्था तरुणांनी करायला हवी.

> ठरावीक गोष्टींसाठीच मोबाईलवर अलार्म सेट करायचा. इतर बाबींसाठी स्मार्टफोनमधील अलार्म या सुविधेचा लाभ घ्यायचा नाही. त्यामुळे बराचसा वेळ वाचू शकतो.

> घरात चार-पाच सदस्य असतील तरी सगळेच सदस्य मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यापेक्षा एकमेकांशी गप्पा मारा. अशावेळी एक लक्षात ठेवायचे घरी आलात की नो मोबाईल…! मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत असताना महत्त्वाचं असेल तरच मोबाईलचा वापर करायचा. नाहीतर फोन बाजूलाच ठेवायचा.

> फोनवर वेळ घालवण्यापेक्षा फिरायला जा. मोबाईलच्या खोटय़ा जगात वावरण्यापेक्षा खऱया जगाचा, निसर्गाचा आस्वाद घ्या. फावल्या वेळात बागकाम करा. त्यात मन रमवा. खूप बरं वाटेल. व्यायाम करा. मोबाईलवर वाया जाणारा वेळही वाचेल.

> झोपण्यापूर्वी अर्धा तास मोबाईल पूर्णपणे बंद करून ठेवायचा. त्यामुळे शांत झोपही लागेल आणि सकाळी झोप पूर्ण होऊन ताजेतवानेही राहाता येते. आठवडय़ातून किमान एक दिवस मोबाईलपासून पूर्णपणे दूर राहायचा प्रयत्न केला पाहिजे.