
सामना प्रतिनिधी, मुंबई
दृष्टिहीन तसेच अंध व्यक्तींना चलनातील नोटा ओळखणे सोयिस्कर व्हावे यासाठी मोबाईल ऍप तयार करण्यात येत असून हे ऍप विनामूल्य मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. हे मोबाईल सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात आज देण्यात आली.
चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे हायकोर्टाने आरबीआयला आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी आरबीआयच्या वतीने ज्येष्ठ वकील श्याम मेहता यांनी बाजू मांडली. तेव्हा त्यांनी कोर्टाला सांगितले की, चार तज्ञांची समिती याप्रकरणी नेमण्यात आली असून गेल्याच महिन्यात त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. तसेच 100 व त्या पेक्षा अधिक मूल्य असलेल्या नोटा ओळखण्यासाठी विशिष्ट चिन्ह वापरण्यात आले आहेत. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत परदेशात अंधांना नोटा तपासता याव्यात यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते त्याची माहिती घेण्याचे आरबीआयला आदेश दिले व सुनावणी तहकूब केली.


























































