
सराईत मोबाईल चोरटय़ाला क्राइम ब्रँच युनिट-11 ने अटक केली. मोहम्मद साहिल कुरेशी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तीन मोटारसायकल आणि चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत.
मोहम्मद हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याच्याविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कारवाईच्या भीतीने तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. तो कांदिवली येथे त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट-11 चे पोलीस हवालदार अजय कदम यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल आणि मोटारसायकल जप्त केली आहे.






























































