
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत केला आहे.
विदर्भातील ओल्या दुष्काळाची पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मदत करावी अशी विनंती मी केली होती. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वेळही मागितली होती. पंतप्रधानांनी तातडीने वेळ दिली. अर्थात त्यामागे माझ्याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे कारण असावे असे सांगून शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांशी दुष्काळ मदतीबाबत चर्चा केली आणि मी निघत असतानाच त्यांनी मला थांबवले आणि महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करूया अशी ऑफर दिली. अर्थात मी ती नम्रपणे नाकारली. माझे तुमच्याशी व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत आणि ते उत्तमच राहतील; पण तुमच्यासोबत राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकत नाही, असे मी स्पष्टपणे सांगितल्याचे पवार म्हणाले.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेची बोलणी वेगात सुरू असतानाच पवार यांनी दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतल्याने तेव्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. आज शरद पवार यांनी त्या सर्व चर्चा झूठ होत्या असे स्पष्ट केले आणि मोदीभेटीत नेमके काय घडले हे सविस्तर सांगितले.
मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते
अजित पवार यांच्या बंडाबाबत बोलताना पवार म्हणाले, लोकांना असे का वाटते की मला याची पूर्ण कल्पना असेल किंवा अजित पवारांच्या या कृतीला माझा पाठिंबा असेल; परंतु हे साफ चुकीचे आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
पवार म्हणाले की, सुरुवातीच्या वेळी मला अजित पवारांनी एकच गोष्ट सांगितली होती. ‘देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलायचं म्हणतात. मी जाऊ का?’ राजकारणात संवाद ठेवला पाहिजे या भूमिकेतून मी अजित पवारांना फडणवीसांशी बोलण्यासाठी होकार दिला; परंतु दुसर्या दिवशी असं काही घडेल याची मला कल्पना नव्हती.
शरद पवार यांनी सांगितले की, दुसर्या दिवशी शपथविधी पाहून मलाही आश्चर्य वाटलं होतं. परंतु त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की, आपलं सरकार किती एफिशियंट आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल हे सगळे किती जोमाने काम करतात हे पाहिलं. सकाळी सहा वाजता हे सगळं घडतंय हे पाहून माझा विश्वासच बसत नव्हता.
शपथविधीला जे लोक उपस्थित होते त्यातले काही चेहरे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, हे लोक असे आहेत जे मी म्हणेन तेच करतील. हे माझे लोक आहेत. त्यामुळे हे जे काही घडलंय आणि घडतंय ते मी सुधारू शकतो याचा मला विश्वास बसला, असे पवार म्हणाले.
तात्त्विक कारणांमुळे विरोध नको!
शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसला कसे राजी केले हेसुद्धा शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितले. मला शिवसेनेची खात्री पटली त्याच दिवशी मी थेट सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आणि तिघांनी मिळून सरकार स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगितले. भाजप वगळून सरकार स्थापन होत असेल तर तात्त्विक कारणांमुळे विरोध करू नये. या संधीचा फायदा घेतला पाहिजे असे सोनियांना सांगितल्याचे पवार म्हणाले. काहीही करायचे असेल तर काँग्रेसला घेऊनच करायचे अशी भूमिका असल्याने काँग्रेसला सत्तेत येण्यास वेळ लागला. शिवसेनेसोबत का जायचे अशी सोनिया गांधी यांची भूमिका होती. त्यावेळी मी वाद घातला नाही, पण मतांवर आग्रही राहिलो. एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही असे सांगितले. आणीबाणी आणि राष्ट्रपती निवडणुकीवेळी शिवसेनाप्रमुखांनी जी भूमिका घेतली होती ते तीन मुद्दे मी सोनिया गांधी यांना पटवून दिले, असे पवार म्हणाले.
विकासाची भूमिका वेगळी
अनेक गोष्टींत तुमची विकासाची, शेती-उद्योग या क्षेत्रातील विकासाची भूमिका वेगळी आणि आमची वेगळी आहे असे मोदींना सांगितल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माझ्याकडून तुम्हाला निश्चितच सहकार्य मिळेल. मात्र मी एक लहानसा पक्ष चालवतो. या पक्षातील सगळय़ांना जी दिशा दिली आहे त्या दिशेबाहेर मी जाऊ शकत नाही. म्हणून तुमची ऑफर नाकारत असल्याचे मोदींना नम्रपणे सांगितल्याचेही पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर रिमोट कंट्रोल नाही
मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असा शब्द मी बाळासाहेबांना दिलाय अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे सरकार चालवण्यासाठी एकवाक्यता ही उद्धव ठाकरे यांच्या नावावर होऊ शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी आमची भुमिका होती. उद्धव ठाकरे ते पद स्वीकारण्यासाठी तयार होत नव्हते; पण ‘हा माझा आदेश आहे’ असे सांगितल्यावर ते तयार झाले, असे पवार म्हणाले. राज्याचा कारभार चालवण्यासाठी आम्ही त्यांना किमान समान कार्यक्रम दिला आहे. मुख्यमंत्र्यांवर रिमोट कंट्रोल ठेवणे हे मला योग्य वाटत नाही. उलट त्यांना मदत केली पाहिजे. सल्ला मागितला तर सहकार्य केले पाहिजे. तीच आमची भावना आहे, असे पवार म्हणाले.
फडणवीसांना ‘मी’पणा नडला
देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणाले होते, पण हा ‘मी’पणाच त्यांना नडला, असे पवार यांनी सांगितले. पाच वर्षांतील सत्तेचा गर्व त्यांना झाला होता आणि तो दिसत होता. लोकांना मीपणा आवडत नाही, तर नम्रता हवी असते. फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणीही नव्हते. नागपूरचे महापौर ते विधानसभेतील एक उत्तम आमदार असा त्यांचा प्रवास आहे. मी म्हणजे महाराष्ट्र हा मीपणा त्यांना नडला आहे. संख्याबळानुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे कबूल आहे, पण तो मोदींमुळे झाला आहे, यांच्यामुळे नाही असेही पवार यांनी फटकारले.
























































