मोहम्मद शमीचं कमबॅक, सरावाला केली सुरुवात; न्युझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार?

टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी मागील 9 महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब आहे. दुखापतीमुळे त्याला IPL आणि टी20 वर्ल्ड कपला मुकावे लागले होते. त्यामुळे चाहते निराश झाले होते. मात्र शमी आता मैदानात उतरण्यास सज्ज झाला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. लवकरच तो एका टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसणार आहे.

मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलनंतर एकही सामना खेळलेला नाही. पायावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज होती. तेव्हापासूनच मोहम्मद शमी मैदानापासून लांब होता. त्यामुळे IPL आणि टी20 वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धांपासून त्याला लांब रहावे लागले होते. मात्र चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून त्याने आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. तसेच तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. कारण मोहम्मद शमी आणि त्याचा छोटा भाऊ मोहम्मद कैफ यांची बंगालच्या 31 सदस्यीय संघात निवड झाली आहे.

PTI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमी बंगालकडून 11 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध आणि 18 ऑक्टोबर रोजी बिहारविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. जर मोहम्मद शमी मैदनात उतरला, तर त्याची ऑक्टोबरमध्ये न्युझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात निवड होण्याची शक्यता आहे.