
हे छायाचित्र पाहून कुणालाही वाटेल की, ही पायवाट आहे. पण ती पायवाट नसून मोखाडा तालुक्यातील पांडवकालीन देवबांध नदी आहे.. विश्वास बसत नाही ना? पण हे भीषण वास्तव असून वाढत्या उष्णतेमुळे ही वेळ आली आहे. नदीपात्रात आता फक्त दगड, गोटेच शिल्लक राहिले आहेत. पाण्याचे स्रोत आटल्याने मोखाड्यात पाणीटंचाईचे भयानक चटके बसत आहेत. दरम्यान या नदीतील पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी हवालदिल झाले असून जनावरांचीही पाण्याअभावी तडफड होत आहे.
देवबांध नदीतून वाघ प्रकल्पाचे पाणी वाहत असते. मात्र यंदा उन्हाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे. बाष्पीभवन झपाट्याने होऊन नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. या नदीपात्राच्या पाण्यावर आडोशी, पाथर्डी आणि बोटोशी भागातील शेतकरी दुबार भातशेती तसेच भाजीपाला लागवड करतात. तसेच या भागातील जनावरे आपली तहान भागवत असतात. पण आता पाणीटंचाईच्या भीषण संकटाला स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.
घरखर्चही भागवणे मुश्कील
देवबांध नदीतील पाण्यावर अवलंबून मोखाडा तालुक्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत असतात. जवळच्या बाजारात हा भाजीपाला विकून मिळालेल्या पैशातून कसाबसा घरखर्च चालवला जातो. पण नदीला पाणीच नसल्याने भाजीपाला पीक काढता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घरखर्चही भागवणे मुश्कील झाले आहे.































































