
सामना प्रतिनिधी, अलिबाग
अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असताना श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या चिली येथील पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना काल 6 जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेतील दोन आरोपी रा. म्हसळा याना श्रीवर्धन पोलिसांनी रात्री अटक केली आहे. परदेशी महिला पर्यटकांवर झालेल्या या घटनेमुळे प्रतिमा मलिन झाली असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने राज्यासह देशातील तसेच परदेशी पर्यटक आवर्जून पर्यटनास येत असतात. परदेशी पर्यटकांना रायगडमधील समुद्राचे व निसर्गाचे आकर्षण असल्याने परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. श्रीवर्धन समुद्र किनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पर्यटनस्थळ म्हणून जागतिक पातळीवर श्रीवर्धनची ओळख आहे. परंतु श्रीवर्धनमध्ये पर्यटक सुरक्षित नसल्याच्या विविध घटना घडत आहेत.
चिली देशाच्या दोन पर्यटक महिलांनी श्रीवर्धनमध्ये पर्यटनास आल्या होत्या. या दोन पर्यटक महिलांनी श्रीवर्धन मधील एका हॉटेलात दोन दिवसांची बुकिंग केली होती. 6 जून रोजी सायंकाळी सुमारे सहाच्या आसपास परदेशी महिला पर्यटक बाजारामधून खरेदी करून नारायण पाखाडीमधून त्यांच्या हॉटेलजवळ जात असताना आरोपी रफिश दफेदार, महंमद कैफ यांनी त्याच्याशी असभ्य वर्तन करून त्याना शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केला आहे.
या घटनेनंतर या परदेशी महिलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून बाजारात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात भादवी कलम 354, 354 ड, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी एस जाधव करत आहेत. सदर घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
























































