मान्सून केरळात आला! दोन दिवसांत कोकणमार्गे मुंबईत मान्सूनपूर्व सरी कोसळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनच्या वाटेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच रविवारी केरळातून आगमनाची खूशखबर धडकली. नैऋत्य मान्सूनने तीन दिवस आधीच केरळात जोरदार एण्ट्री मारली आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी मान्सूनच्या आगमनाची ही खूशखबर दिली. मान्सून आगेकूच करीत महाराष्ट्रात 10 जूनला दाखल होईल, तर पुढच्या दोन दिवसांत कोकणमार्गे मुंबईत मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

15 दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ घोंघावले होते. त्याआधारे हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती. मात्र मागील काही दिवस नैऋत्य मान्सूनने हुलकावणी दिली. अखेर रविवारी त्याने केरळमध्ये जोरदार एण्ट्री मारली. आग्नेय अरबी समुद्रात पश्चिमी वाऱयाची ताकद ताशी 15 ते 20 किमीपर्यंत वाढली आहे. तसेच आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ लगतच्या भागात तीव्र ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मागील 24 तासांत केरळातील 14 पैकी 10 पर्जन्य नियंत्रण पेंद्रांवर 2.5 मिमि.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ही सर्व मान्सूनच्या आगमनाची संकेत देणारी स्थिती आहे, असे हवामान खात्याने रविवारी आपल्या बुलेटीनद्वारे जाहीर केले. 1 जूनपर्यंत केरळात मान्सून धो-धो कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस
पुढील चार ते पाच दिवसांत कर्नाटकसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता असली तरी त्याआधी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी लागेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

असा असेल मान्सूनचा प्रवास
– मान्सून पुढील चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडू. कर्नाटक आणि दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल.
– 30 जूनपर्यंत मान्सून दिल्ली आणि पंजाबपर्यंतचा सर्व भाग व्यापून टाकेल.

– आठवडाभर मान्सूनची गती धिमी असेल. 6 ते 10 जूनदरम्यान मान्सून पुन्हा जोर धरेल.
– महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल. पुढे 15 जूनपर्यंत मध्य प्रदेशमध्ये धडकेल.