पडला कमी, नडला जास्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘तो परत आलाय’ अशी आवई शनिवारीच उठली होती. त्याच्यामुळे संडे फंडे होणार अशी अटकळ होती. आज ती खरी ठरली. मात्र हा ‘पाऊस’ सुलभ हप्त्यावर पडत होता. थांबून, थांबून! कधी तासभर संततधार तर कधी हलकीशी सर. त्यामुळे मुंबईत गारवा आला, पण कुठे पाणी तुंबले नाही. दिवसभर तो पडला कमी, नडला जास्त. कारण मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी पडझड झाली.

आजही कोसळणार पण पुन्हा गायब होणार
उद्या सोमवारीही मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाण्यात ढगाळ वातावरण राहील. पाऊसही असाच थांबून थांबून कोसळेल. त्यानंतर मात्र पाऊस पुन्हा सुट्टीवर जाणार असून पुढच्या आठवडय़ात २२ ते २८ जूनदरम्यान पुन्हा हजेरी लावेल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. पुढच्या आठवडय़ातच मान्सून मुंबईसह उपनगरांत सक्रिय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात एका झाडामुळे पाच गाडय़ांचे नुकसान
-ठाण्यात तीन हात नाका परिसरात इटर्निटी मॉलजवळ झाड कोसळून टोयाटो, फियाट, ह्युंदाई ग्रॅण्ड आय १०, टोयाटा किर्लोस्कर, व्होल्क्सवॅगन या गाडय़ांचे नुकसान झाले. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
-दिंडोशी, मालाड पूर्व, अंधेरी पश्चिम, आरे कॉलनी या ठिकाणी झाडे पडली. यात अंधेरी पश्चिमेकडे एक झाड इनोव्हा गाडीवर पडून गाडीचे प्रचंड नुकसान झाले. जोगेश्वरीतील घटनेत सहा चारचाकी आणि दोन दुचाकी गाडय़ांचे नुकसान झाले.

मेगाब्लॉकमुळे हाल
मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसचा एक भाग असलेल्या नव्या फलाटाच्या कामासाठी घेण्यात आलेला आठ तासांचा मेगाब्लॉक तासभर लांबल्याने आणि त्यातच पावसाचा जोरदार मारा झाल्याने चाकरमान्यांचे रविवारी प्रचंड हाल झाले. कुर्ला, घाटकोपर, दादर, शीव, परळ स्थानकांमध्ये त्यामुळे प्रचंड गर्दी झाली. ईदची गर्दी असूनही तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेतल्याने घराबाहेर पडलेले प्रवासी कोंडीत सापडले.

भिंती कोसळल्या; एक जखमी
जोगेश्वरी, मानखुर्द येथील सोनापूर रोड, धारावीतील ९० फुटी रोडवरचे महाकाली मंदिर या ठिकाणी भिंत कोसळली. यात धारावीत कोसळलेल्या भिंतीखाली सापडून ६८ वर्षांचे जेसू मरीयाना नाडर हे जखमी झाले.