
सामना प्रतिनिधी । मुंबई
नागपूरमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ जुलैपासून अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात २० जुलैपर्यंत कामकाज होईल. १७ दिवसांच्या कामकाजाच्या दिवसांत चार सुट्टय़ा असल्याने प्रत्यक्षात हे अधिवेशन १३ दिवसच चालणार आहे.
विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यावेळी शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात नवीन ९ आणि प्रलंबित १० विधेयके मांडली जाणार आहेत.
या अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजासंदर्भात विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानुसार ४ ते २० जुलैपर्यंत या अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे. एकूण १७ दिवसांच्या कामकाजात चार सुट्टय़ा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवार, ७ जुलै आणि रविवार, ८ जुलै तसेच शनिवार, १४ जुलै आणि रविवार, १५ जुलै या दिवशी अधिवेशनाला सुट्टी असल्याने प्रत्यक्षात केवळ १३ दिवस कामकाज होईल. पहिल्या दिवशी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव मांडण्यात येईल. या अधिवेशनात नवीन ९ आणि प्रलंबित १० अशी एकूण १९ विधेयके मांडली जातील. विधान परिषदेतील एकूण ११ सदस्यांची मुदत संपत असल्याने विधान परिषदेत कामकाजाच्या शेवटच्या दिवशी या सदस्यांना निरोप दिला जाईल.
नागपुरातील तिसरे पावसाळी अधिवेशन
येत्या ४ जुलैपासून नागपूर येथे सुरू होणारे पावसाळी अधिवेशन हे नागपुरातील तिसरे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापूर्वी १९६१ मध्ये १४ जुलै ते ३० ऑगस्टपर्यंत तर दुसरे पावसाळी अधिवेशन १९६६ साली २९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत पार पडले होते.



























































