
सामना प्रतिनिधी । पेण
गढूळ पाणी पुरवठा, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील खड्डे या व इतर समस्यांचा जाब विचारण्याकरीता तसेच नगरपालिकेत चाललेल्या अनागोंदी कारभाराविरोधात आज गुरुवारी पेण नगरपालिकेतील विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जन आक्रोश मोर्चा काढून नगरपालिकेच्या कारभाराविरोधात आपला रोष व्यक्त केला.
पाणी पुरवठा योजनेसाठी १८ कोटी रुपये खर्च करुन देखील पेण मधील जनतेला अशुद्ध व गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने नगरसेवकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना अशुद्ध पाणी बाटली भेट दिली. या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पाटील, सदस्य महादेव दिवेकर, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, गटनेते निवृत्ती पाटील, शोमेर पेणकर, राजू वारकर, मंगेश पेडामकर, नगरसेविका प्रतिभा जाधव, वसुधा पाटील, अर्पिता कुंभार, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष घाटे सर, अण्णा वनगे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पाटील म्हणाल्या की, जनतेला फक्त स्वच्छ पाणी व पारदर्शक कारभार हवा आहे. जनतेला रस्त्यावर यावे लागते, हे नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. पाण्यासाठी मागणी केली तर निधी उपलब्ध करुन देऊ. मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. ही सुरुवात आहे. आंदोलनं अधिक तीव्र करु, असा इशारा नीलिमा पाटील यांनी यावेळी दिला.
शेकाप नगरसेवक शोमेर पेणकर यांनी नगरपालिकेत चाललेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. स्विमिंग पूलासाठी व जलतरण तलाव अशा एकाच गोष्टीसाठी दोन वेळा निधी खर्च दाखविला जातो, वृक्षारोपणासाठी १७ लाख व सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली ६ लाख असे वेगवेगळे खर्च दाखविले जातात. गार्डन मेंटेनन्स व बगीचा सफाईसाठी असे वेगळे ठेके काढले जातात. त्याचे पुरावे असून यांचा हा भ्रष्टाचार जास्त काळ चालू दिला जाणार नाही, असे पेणकर म्हणाले. पेण शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून स्वच्छ पेणची यांनी वाट लावली असा आरोप नगरसेविका प्रतिभा जाधव यांनी यावेळी केला. दर वर्षी एक कोटी ९७ लाख रुपये बील घेणारा सफाई ठेकेदार असलेल्या वेंकेटेश कंपनीला सभागृहा समोर आणण्याची अनेक वेळा मागणी केली मात्र त्या ठेकेदाराला कधीही सभागृहात आणले नाही.
वर्षाला ६० लाख रुपयांची बिले औषध फवारणीच्या नावाने काढली जातात मात्र फवारणीचा पत्ता नाही असा आरोप देखील प्रतिभा जाधव यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे बौद्धवाड्यातील समाज मंदिराचा एक कोटी रुपयांचा निधी परत गेला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.






























































