
देशात जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथे तिथे मुस्लिमांवर अन्याय होत आहे. त्या राज्यात मुस्लिम खुल्या तुरुंगात राहत असल्यासारखे दिसतात, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
गरब्याच्या कार्यक्रमावर दगडफेक केल्याप्रकरणी काही मुस्लिम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून 300 ते 400 लोकांसमोर लाठीने मारहाण केल्याची घटना गुजरातमध्ये घडली. मुस्लिम तरुणांना मारहाण करताना लोक घोषणाबाजीही करत होते. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ओवेसी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
खेडा जिह्यातील उंडेला गावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमावर मुस्लिम तरुणांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात जण जखमी झाले. आरोपींनी मशिदीजवळ आयोजित गरबा कार्यक्रमावर आक्षेप घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दगडफेकीच्या आरोपाखाली 13 जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.





























































