मॉरीसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरीस नोरोन्हाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला रात्री उशिरा क्राईम ब्रँच युनिट-11ने अटक केली. मॉरीसने गोळीबार करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या का केली याचा सखोल तपास क्राईम ब्रँच करणार आहे. मिश्राला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट-11कडे सोपवण्यात आला. तपास हाती येताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. फेसबुक लाइव्ह दरम्यान मॉरीसने मेहुलचे नाव घेतले होते. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक रिव्हॉल्व्हर आढळून आले. ते रिव्हॉल्व्हर अमरेंद्र मिश्राचे होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्या दोघांची काही तास चौकशी केली. मॉरीस हा मिश्राकडून रिव्हॉल्व्हर घेऊन स्वतःकडे ठेवायचा. गोळीबाराच्या घटनेपूर्वी मॉरीसने मिश्राकडून ते रिव्हॉल्व्हर घेतले होते. त्याच रिव्हॉल्व्हरचा वापर करून मॉरीसने अभिषेक यांच्यावर गोळीबार करून स्वतः आत्महत्या केली. काही तासांच्या चौकशीनंतर आज रात्री पोलिसांनी मिश्राला अटक केली.

मॉरीस बदला घेण्याबाबत वारंवार बोलत होता

येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका झाल्यानंतर मॉरीस प्रचंड रागात होता. अभिषेक घोसाळकर यांचा बदला घेण्याबाबत तो वारंवार बोलत होता, असे मॉरीसच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

मॉरीसवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर…

मॉरीसविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर पोलिसांनी मॉरीसवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर त्याला पोलिसांची जरब बसली असती. तसेच मॉरिसवर दाखल असलेले गुन्हे पाहता तो असे काही कृत्य करेल यावर पोलिसांनी लक्ष ठेवले पाहिजे होते. पोलिसांनी मॉरिसवर लक्ष ठेवले असते तर कालची घटना घडली नसती, असे बोलले जात आहे.