
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरात पावसाळा कालावधीत डासांची पैदास वाढली असून नागरिक डासांच्या त्रासाने त्रस्त बनले आहेत. वाढत्या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मालवण नगरपरिषद आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, मालवण यांच्या वतीने डास निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरात डासांची पैदास होणाऱ्या विनावापर विहिरी, तुंबलेली गटारे, साठलेली पाण्याची डबकी यामध्ये गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला.
साठलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असते. त्यामुळे या डास निर्मूलन मोहिमेसाठी मालवण शहरातील बाजारपेठ, मशीद गल्ली, गवंडीवाडा, दांडी, वायरी, आडवण, धुरीवाडा, मेढा रेवतळे, भरड आदी भागातील विनावापर विहिरी, तुंबलेले गटार, नाले, साठलेल्या पाण्याची डबकी निश्चित करण्यात आली असून त्यातील डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यात गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. पालिकेच्या वतीने डास फवारणी मोहिमही सुरू आहे. अशी माहिती आरोग्य सभापती आपा लुडबे यांनी दिली.
मोहिमेचा शुभारंभ मालवण बाजारपेठ येथील वेलकम इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या विनावापर विहिरीत गप्पी मासे सोडून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक गणेश कुशे, नितीन वाळके, दीपक पाटकर, नगरसेविका ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक जे. ए. गोसावी, आरोग्य सहाय्यक बी.एच. कुबल, बी. आर. कोरडे, आरोग्य कर्मचारी एस. ए. चांदोसकर, जी.एन. सुर्वे, के.एन. माजीक, नगरपरिषद कर्मचारी जयसिंग गावीत, हेमंत कोचरेकर, रमेश कोकरे आदी उपस्थित होते.





























































