लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीच्या तोंडात बोळा घालून लुटले; गाडी शिकविण्याच्या बहाण्याने तरुणाचे कृत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाडी शिकविण्याच्या बहाण्याने दोनजणांनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीचे अपहरण करुन तिच्या तोंडात बोळा घालून लुटल्याची धक्कादायक घटना उंड्रीतील पिसोळी ते नताशा हिल व्हिव रस्त्यावर घडली. ही घटना मंगळवारी सकाळी 8.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी राजेश सिंग (रा. साळुंखे विहार सोसायटी) आणि राजेश अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. श्रीदेवी जर्नादन नंदम (रा. साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी आयटी कंपनीत कामाला असून त्यांना मोटार चालवायला शिकायची होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या ओळखीतील राजेश सिंगने श्रीदेवीला मोटार शिकवण्याची तयारी दर्शविली. मागील सात दिवसांपासून राजेश श्रीदेवीला मोटार शिकवित होता. मंगळवारी सकाळी राजेश सिंग श्रीदेवीला मोटार शिकवित होता.

मोटार शिकवत अशताना त्याचा दुसरा साथीदार राजेश तेथे आला. दोघांनी मिळून श्रीदेवी यांचे हात सीटला बांधून ठेवले. त्यांच्या तोंडात रूमाल कोंबून मास्क लावला. आरोपींनी गुगल पेद्वारे श्रीदेवी यांच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यावर फिरवले. त्यानंतर श्रीदेवी यांच्याकडील दागिन्यांची चोरी केली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन एटीएम घेत 10 हजार रुपये घेतले. असा एकूण एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल त्यांनी चोरला आहे.

गाडी शिकविण्याच्या बहाण्याने ओळखीतील तरुणाने महिलेचे हात बांधून लूट केली आहे. याप्रकरणी दोघांचाही शोध घेतला जात असून घटनेचा तपास सुरु आहे.
– दीपक बर्गे, सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे