महाराष्ट्रात रुग्ण बरे झाले ते ‘भाभीजी के पापड’ खाऊन काय? शिवसेना राज्यसभेत आक्रमक

sanjay-raut-rajya-sabha

कोरोनाविरुद्ध सध्या सर्वजण मोठी लढाई लढत आहेत, मात्र देशाच्या सरकारातल्या मंत्र्याने ‘भाभीजी पापड’ लाँच करत हे पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो, असा छातीठोकपणे दावा केला होता. प्रत्यक्षात हे मंत्रीच कोरोनाग्रस्त झाले. महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने रुग्ण बरे होत आहेत. डब्ल्यूएचओनेही याचे कौतुक केले आहे.  असे असताना काही लोक महाराष्ट्राची निंदा करीत आहेत. एकढे लोक कोरोनामुक्त झाले ते ‘भाभीजी के पापड’ खाऊन झाले काय? असा परखड सवाल करीत शिवसेनेने आज राज्यसभेत जबरदस्त घणाघात केला.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोरोनावरील चर्चेत सहभागी होताना केंद्र सरकारवर राज्यसभेत जोरदार हल्लाबोल केला. ‘भाभीजी पापड’ खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते, कोरोना बरा होतो, असे तर्कट एका केंद्रीय मंत्र्याने लावले होते. त्याचा समाचार  घेत राऊत यांनी कोरोनातून बरे झालेल्ल्या एवढ्या मोठया प्रमाणावरील लोकांनी भाभीजी पापड खाल्ले होते का? ही लढाई राजकीय नसून लोकांचे जीव वाचविण्याची लढाई आहे, अशा शब्दांत टीकाकारांना खासदार संजय राऊत यांनी सुनावले.

महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीचे आंतरराष्ट्रीय पातळीकर कौतुक

कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असली आणि त्यावरून सरकारला विरोधक टार्गेट करत असले तरी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कामगिरीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. मुंबईतली विशेषतः धारावीतली परिस्थिती खूपच गंभीर होती. त्यावर महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने पावले उचलून मात केली. माझ्या आई आणि भावालाही कोरोना झाला होता. कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. ही वेळ राजकीय लढाई लढण्याची नाही तर लोकांचे प्राण वाचविण्याची आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या