
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएसीचा) डेटा आज लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एमपीएसीच्या 30 एप्रिल रोजी होणाऱया गट ‘ब’ आणि गट ‘क’ परीक्षेला सामोरे जाणाऱया लाखभर विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच आयोगामध्येही खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून याचा तपास नवी मुंबई पोलीस आणि सायबर सेल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱया परीक्षेचे हॉल तिकीट आयोगाने दोन दिवसांपूर्वीच संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात आली आहेत. त्यानंतर आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिल्यानंतरसुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल होत असल्याने डेटा सिक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, हॉल तिकीट व्हायरल झाल्यानंतरही दोन तास लिंक सुरू कशी राहते? केवळ हॉल तिकीट व्हायरल झाले, डेटा लीक झाला नाही हे एमपीएससीला कसे कळले असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उमेदवारांचा अन्य डेटा लीक झालेला नाही – एमपीएससी
व्हायरल झालेल्या हॉल तिकिटाबाबत एमपीएससीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार आयोगाने 30 एप्रिल रोजीच्या नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून दिली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून दिलेली प्रवेश प्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. सदर बाह्यलिंकद्वारे दिली जाणारी सुविधा बंद केल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. तसेच हॉल तिकीट वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचा कोणताही वैयक्तिक डेटा किंवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.



























































