तावरजा मध्यम प्रकल्प गाळमुक्त माळरान बनले गाळयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, उटी बुद्रुक

औसा व लातूर तालुक्यातील सीमेवर असलेल्या तावरजा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साठला गेला होता. गेल्या तीन महिन्यापासून गाळ उपसा जोमाने सुरू झाला आहे. पाणलोट क्षेत्र 27.727 दलघमी पाणीसाठा होणारा हा प्रकल्प यावर्षी कोरडा पडला आहे त्यामुळे गाळ उपसा करण्यास सुलभ झाले आहे.

तावरजा मध्यम प्रकल्पाची निर्मिती 1982 झाली झाली. हा प्रकल्प 36 वर्षात सोळा वेळेस पूर्ण क्षमतेने भरला. यावर्षी पावसाने दडी मारल्याने हा प्रकल्प कोरडा पडला आहे यापूर्वी 2014-15 वर्षीही मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाला होता. यावर्षी गेल्या तीन महिन्यापासून दररोज 400 ते 500 ब्रास होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचबरोबर या गाळाने अनेक गावचे माळरान सुपीक बनले आहे. भादा, बुऱ्हाणपूर, कळमता, वडजी, आंदोरा, जायफळ, समदर्गा, कोरंगळा, उटी, औसा, शिवली इत्यादी गावातील माळरान गाळयुक्त बनत आहेत. तावरजा मध्यम प्रकल्पातून औसा नगर परिषद पाणी पुरवठा तसेच वीस खेडी, पाचखेडी गंगापूर, खंडापूर, पेठ, अलमला इत्यादी ठिकाणी पाणी पुरवठा केला जात होता. हा प्रकल्प कोरडा पडल्याने वरील गावांना पाणी पुरवठा करणे जिकिरीचे झाले आहे. पण गाळ उपसा झाल्याने पुढील काळात एकदा प्रकल्प भरला की, दोन ते तीन वर्षे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तावरजा मध्यम प्रकल्पाला दोन कालवे असून दोन्ही रब्बी व खरीप हंगामासाठी किमान तीन ते चार वेळेस पाणी सोडण्यात येते यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला तर प्रकल्पाच्या खालच्या भागातील शिउर, आलमला, चिंचोलीराव वाडी, पेठ इत्यादी गावांना पाणी पुरवठा योग्य वेळी करण्यात येईल. ऊसासाठी सुद्धा या साठवणीचा फायदा होईल त्यामुळे या गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.