नाल्यातील कचरा – चिखल रस्त्यावर;२४ दुचाकीस्वार घसरले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर महिनाभरात महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला असून नुकत्याच झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचा नाल्यातील कचरा – चिखल रस्त्यावर आला आहे. गुरूवारी कौस्तुभ मंगल कार्यालयाजवळ तब्बल २४ जण गाड्या स्लीप होऊन खाली कोसळले. यातील काही नागरिक जखमी झाले तर काहींना किरकोळ मार लागला आहे.

येथे नालीमधील कचऱ्यासह काळीमातीही रस्त्यावर आली होती. त्यामुळे घसरगुंडी झाल्याने गाड्या घसरत होत्या. असाच घसरगुंडीचा प्रकार स्टेडियम मधील काही गाळ्यासमोर झाला असून यामुळे दुचाकीस्वारांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

मनपातील शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे, भाजपाचे सदस्य रितेश जैन-झांबड, अक्षय देशमुख व अन्य आठ कर्मचाऱ्यांनी मात्र कौस्तुभ मंगल कार्यालयासमोर धाव घेत तातडीने हातात फावडे, टिकास व टोपले घेऊन श्रमदान सुरु केले. रस्त्यावर आलेली काळीमाती आणि चिखल खरडुन काढला. नाला मोकळा करण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र विफल ठरला. आऊटलेट पाईप एकच असल्यामुळे आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नाल्यातील गाळ रस्त्यावर येत असून यामुळेच ही घसरगुंडीची समस्या वारंवार होत आहे. नगरसेवकांनी स्वखर्चाने एक मोठे टिप्पर भरुन बिल्डिंग मटेरियल रस्त्यावर आणून टाकले. त्यानंतर शिवसेना गटनेते चंदू शिंदे, भाजप नगरसेवक रितेश झांबड यांनी मनपा प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले. शहरातील जायकवाडी ते देशमुख हॉटेल या रस्त्यावरील नालीची व खड्डेयुक्त रस्त्यांची समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी केली. तसेच मनपातील काही लोकप्रतिनिधी स्वत:च्या स्वार्थापोटी जनसामान्यांचे नुकसान करत असल्याबाबत संताप व्यक्त केला.

शहरातील सुपर मार्केट ते देशमुख हॉटेल या रस्त्यावर जायकवाडी समोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नालीचे पाणी सतत बाराही महिने वाहत असते. यामुळे रस्त्यावर जाताना-येताना नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरुन दररोज किमान २० हजार लोक ये-जा करतता. तसेच दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी शिकवणीकरीता जाणे येणे करतात. गेल्या महिन्यात ६५ लोक या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पडलेले आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने नागरिक, विद्यार्थी यांचा विचार करुन तातडीने रस्त्यावरी खड्डे प्रमाणिकपणे बुजवावेत आणि नाल्यांची साफसफाई दररोज करुन रस्ता सुरुळीत ठेवावा, अशी मागणीही या नगरसेवकांनी मनपा प्रशासनाकडे आज केली आहे.