
दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर सोमवारी सायंकाळी शेअर बाजारात तासभर ट्रेडिंगचे विशेष सत्र पार पडले. यामध्ये गुंतवणूकदारांनी विविध कंपन्याच्या शेअरची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने भांडवली बाजारात मोठी उसळी दिसून आली. सेन्सेक्सने 524 अंकांनी उसळी घेतली तर निफ्टी 154 अंकांनी वधारला. त्यामुळे गंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र मुहूर्ताच्या ट्रेडिंगचा मोठा फटका येस बँकेला बसला असून त्यांचे शेअर केवळ तासाभरात 3 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे येथे गंतवणूक केलेल्यांना इंट्राडेमध्ये मोठी झळ सोसावी लागली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर आर्थिक व्यवहार करणे शुभ मानले जाते. त्यानुसार शेअर बाजारात गेल्या 100 वर्षापासून मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा आहे. त्यापार्श्वभूमीवर आज सायंकाळी 6.15 पासून एका तासाचे झाले. ते अनेकांना लाभदायक ठरले आहे. सेनसेक्सने 524 अंकांनी उसळी घेत 59970 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 154 अंकांनी वधारत 17700 चा टप्पा पार केला. त्यामुळे अशीच भांडवली बाजारात सकारात्मक राहिली तर पुढील दिवाळापर्यंत निफ्टी 20 हजाराचा टप्पा पार करेल असा अंदाज जाणकार गुंतवणूकदार करत आहेत.
आयसीआयसीआय डायरेक्टची पसंती
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये आयसीआयसीआय डायरेक्टने हेवेल्स इंडिया लिमिटेड, लाऊरस लॅब्ज, शालबाय लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी, पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, सीएसबी बँक लिमिटेडला पसंती दिली आहे.


























































