‘ए वार्ड’मध्ये पाणी नक्की कुठं मुरतंय? शिवसेनेचा ‘हंडा मोर्चा’चा इशारा

water-tab

सामना प्रतिनिधी । मुंबई

अतिशय प्रतिष्ठत समजल्या जाणाऱ्या ‘ए वॉर्ड’मधील काही विशिष्ट भागांत गेल्या महिनाभरापासून पाणी कमी दाबाने येऊ लागले आहे. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याची तक्रार रहिवासी करत आहेत. जलवाहिन्या जिर्ण झाल्याचे कारण अधिकारी देत असले तरी निवडणुकीच्या तोंडावर अचानक आलेल्या पाणीटंचाईमुळे नक्की पाणी कुठे तरी मुरतंय, अशी शंका निर्माण झाली आहे.

‘ए वॉर्ड’मधील शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांच्या वॉर्डात गेल्या महिनाभरापासून अचानक पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पाणी येत आहे. मेट्रो प्राधिकरणाने मोठय़ा प्रमाणावर खोदकाम केलेले असल्यामुळे जलवाहिन्या फुटणे, दूषित पाणी येणे असे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत.

याबाबत शिवसेना नगरसेविका सुजाता सानप यांनी आतापर्यंत जल अभियंता विभागाच्या अधिकाऱयांशी अनेकदा बैठका घेतल्या असून अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. जलवाहिन्या जुन्या व जिर्ण झाल्या असल्याचे कारण अधिकारी सांगत असल्याचे सुजाता सानप यांनी सांगितले. मात्र ही समस्या महिनाभरात दूर झाली नाही तर अधिकाऱयांच्या विरोधात ‘हंडा मोर्चा’ आणण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

कुलाबा परिसरातील

कोळीवाड्यात पहाटे चार वाजता पाण्याची वेळ असते. पण इथे पाणीच येत नसल्यामुळे सानप यांनी सोमवारी पहाटे चार वाजता अधिकाऱयांना बोलवून पाहणी केली.

पाण्याच्या वेळा कोणासाठी बदलल्या?

फोर्ट विभागात रात्री आठ ही पाण्याची वेळ असली तरी तिथे नऊ वाजता पाणी येते. कोळीवडय़ातल्या पाण्याच्या वेळा बदलण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र इथल्या कोळीवडय़ातले रहिवाशी पाणी भरून पहाटे बंदरावर जातात. त्यामुळे कोणाच्या राजकीय हितासाठी पाण्याच्या वेळा बदलू देणार नाही, असाही इशारा सानप यांनी दिला आहे.