
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज 18 वर्षांवरील सर्व पात्र 92 लाख 36 हजार 500 नागरिकांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट पालिकेने आज सकाळच्या पहिल्याच सत्रात गाठले. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचा यामध्ये समावेश आहे. या कामगिरीमुळे मुंबईने देशातील दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरूसह सर्व महानगपालिकांमध्ये सर्वोत्तम ठरण्याचा मान पटकावला आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तब्बल 10 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण सुरू झाले. यामध्ये सद्यस्थितीत पालिका, सरकार आणि खासगी अशा 462 पेंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दररोज 50 हजार ते एक लाखांपेक्षा जास्त डोस दिले जात आहेत. यानुसार संपूर्ण मुंबईत पहिला आणि दुसरा डोस मिळून एपूण दीड कोटी डोस देण्याची कामगिरी 10 नोव्हेंबर रोजी साध्य करण्यात आली. त्यापाठोपाठ पहिल्या मात्रेचे लक्षांक गाठून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.
असे गाठले उद्दिष्ट
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 92 लाख 36 हजार 500 पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण उद्दिष्टय़ आहे. यापैकी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 92 लाख 39 हजार 902 नागरिकांनी पहिली मात्रा घेतल्याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेत स्थळावर झाली आहे. म्हणजेच पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले. दरम्यान, दुसरा डोस पूर्ण करण्यासाठीदेखील वेगाने कार्यवाही सुरू असून
60 लाख जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे.
लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा यासाठीदेखील पालिका प्रशासनाकडून आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये आज दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत सुमारे 59 लाख 83 हजार 452 मुंबईकर नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद झाली.































































