
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक मंगळवार 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ तत्काळ करावी, अवैध प्रवासी वाहतुकीबरोबरच ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवा बंद करावी या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होणार आहेत.
रिक्षाचालकांना भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याअंतर्गत असावे, ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा बंद करावी आदी मागण्यासाठी परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱयांकडे वारंवार बैठका झाल्या आहेत, पण त्या पूर्ण करण्याबाबत सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील रिक्षाचालक संपावर जाणार असल्याचे ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने स्पष्ट केले आहे.
प्रमुख मागण्या
रिक्षाच्या भाडय़ात चार-सहा रुपये भाडेवाढ करावी.
ओला-उबेरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी.
बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथके नेमावीत.
विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे कल्याणकारी महामंडळात भरावेत.
चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत द्यावी.
हकिम समितीच्या शिफारशीनुसारच भाडेवाढ करावी.





























































