मुंबई-बांदादरम्यान एसटीच्या आजपासून दोन स्लीपर बस धावणार

मुंबई-ठाण्यातून गोव्याला जाणाऱया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मुंबईकरांना सहजपणे गोव्यात जाता यावे म्हणून उद्या, बुधवारपासून मुंबई सेंट्रल आणि बोरिवली येथून गोव्यासाठी दोन विनावातानुकूलित स्लीपर बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा गोव्याला जाणाऱया पर्यटकांसाठी चालवल्या जाणार असल्या तरी तुर्तास परिवहन विभागाकडून त्याबाबतची परवागी न मिळाल्याने बांद्यापर्यंतच चालवल्या जाणार आहेत.

गोवा पर्यटन केंद्र असल्याने मुंबईतून दररोज गाव्यासाठी अनेक खासगी लक्झरी बस, ट्रेन धावतात. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल-बांदा (कोल्हापूरमार्गे) तर बोरिवली-बांदा (महाड, चिपळूणमार्गे) चालवल्या जाणार आहे. परिवहन विभागाकडून परवाना मिळाल्यानंतर या दोन्ही गाडय़ा पणजीपर्यंत चालवण्याचे एसटीचे नियोजन आहे. महाड, चिपळूणमार्गे जाणाऱया विनावातानुकूलित गाडीमुळे कोकणात जाणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • कोल्हापूरमार्गे जाणाऱया गाडीसाठी 1245 रुपये तिकीट असणार आहे, तर महिला प्रवाशांसाठी 625 रुपये असणार आहे.
  • महाड, चिपळूणमार्गे जाणाऱया गाडीसाठी 1169 रुपये तिकीट असणार आहे, तर महिलांसाठी 585 रुपये तिकीट असणार आहे.