
सफाई कामगार हे अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे त्यांच्या कामातील कंत्राटदारी पद्धत बंद करा, असे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले होते. मात्र जे. जे. रुग्णालयात आजही कंत्राटी पद्धत सुरू आहे. रुग्णालयाला जर खरोखरच सफाई कर्मचाऱयांची आवश्यकता असेल तर त्यांनी प्रलंबित 2 हजार 15 सफाई कामगारांच्या वारसांना तत्काळ कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या मोहिमेत अत्यावश्यक सेवेत मोडणाऱया हजारो सफाई कामगारांचाही मोठय़ा प्रमाणात योगदान आहे. ‘कोरोना योद्धे’ असलेले अनेक सफाई कामगार यात शहीद झाले आहेत. जिवाची बाजी लावून काम करून मुंबईकरांच्या आरोग्यासाठी झटणाऱया कामगारांमध्ये शेकडो कामगार हे कंत्राटी पद्धतीने राबत आहेत. त्यात आता सर जे. जे. रुग्णालयातही कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचाऱयांची भरती केली जाणार आहे. मात्र, जे. जे. रुग्णालयात 2014 पासून 2015 पर्यंत सफाई कामगारांचे वारस हे कामापासून वंचित आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळात जिवाची बाजी लावून काम करणाऱया सफाई कामगारांच्या वारसांची कायमस्वरूपी भरती करावी आणि कंत्राटी पद्धत बंद करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.





























































