
कोरोनामुळे गेले 10 महिने बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाले असून बच्चे कंपनीसह मोठय़ांनीही शक्ती, करिश्मा या वाघाच्या जोडीला पाहण्याचा आनंद घेतला. पेंग्विनच्या पाण्यात सूर मारण्याच्या गंमती-जमतीही अनुभवल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू करण्यात आलेल्या उद्यानाला पहिल्या दिवशी 1,419 पर्यटकांनी भेट दिली.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्यामुळे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी हे उद्यान सुरू करण्याला परवानगी दिली आहे. आज पहिल्या दिवशी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ कमी असली तरी या वन्य प्राण्यांना भेटण्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱयावर ओसंडून वाहत होता. उद्यान सुरू झाल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच शक्ती आणि करिश्माच्या पिंजऱयाकडे वळत होती. राजेशाही थाटातली ही जोडगोळी पाहण्यासाठी बच्चेकंपनीच्या उडय़ा पडल्या. त्यानंतर बिबटय़ाची मादी पिंटो आणि नर ड्रगन तसेच तरस, कोल्हा आणि शेवटी पेंग्विन कक्षाकडे पर्यटक वळत होते. सोमवार असूनही पर्यटकांनी कुटुंबीयांसह प्राणिसंग्रहालयाला आवर्जून भेट देत फिरण्याचा आनंद घेतला. 60 वर्षांवरील ज्येष्ठांनी हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय मोफत पाहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनआधी उद्यानाला दरदिवशी पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी 15 हजारांपर्यंत पर्यटक भेट देत होते. मात्र, आज पहिल्या दिवशी 1 हजार 419 पर्यटकांनी भेट दिली असून 69 हजार 600 रुपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
भाऊ दाजी लाड संग्रहालय सुरू
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आवारात मुंबई आणि मुंबईचा उगम, जुन्या नावासह सुरुवातीची लोकसंस्कृती याची माहिती देणारे भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयही आजपासून सुरू झाले आहे. मात्र, त्याचे स्वतंत्र व्यवस्थापन असून पालिकेकडे त्याची जबाबदारी नाही. पहिलाच दिवस असल्यामुळे पर्यटकांची संख्या इथेही कमी होती.
मॉर्निंग वॉक, उद्यान सहलींनाही परवानगी
मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी 53 एकर परिसरात पसरलेल्या या उद्यानात देशी-परदेशी झाडे, पुरातन वृक्ष मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे मोकळी आणि खेळती हवा, मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन असल्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शहरातील अनेक जण केवळ मार्ंनग वॉकसाठी या उद्यानात येतात. मात्र, सध्या तरी उद्यानात आत जाणाऱया मुख्य गेटजवळील इन्ट्रन्स प्लाझापर्यंत आजपासून मार्ंनग वॉकला परवानगी देण्यात आली आहे. मार्ंनग वॉकसाठी 150 रुपयांचा पास दिला जातो. उद्यानात असलेल्या शेकडो झाडांची ओळख करून देणाऱया उद्यान सहलींनाही परवानगी देण्यात आली आहे.
‘द मुंबई झू’ सोशल मीडिया पेजचे आज लोकार्पण
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात होणारे विविध शैक्षणिक कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रम प्रभावीपणे मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याकरिता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज (फेसबुक, युटयूब, ट्विटर आणि इंस्टाग्राम) ‘द मुंबई झू’ या नावाने सुरू करण्यात येत आहे. ‘द मुंबई झू’ या नावाने सुरू करण्यात येणाऱया ‘सोशल मीडिया पेज’चा लोकार्पण सोहळा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते 16 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता प्राणिसंग्रहालयाच्या थ्रीडी प्रेक्षागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.































































