
मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी संसदीय कार्यमंत्री ऍड. अनिल परब यांनी विधानसभा व विधान परिषदेत मांडला. हा प्रस्ताव दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला.
हा प्रस्ताव मांडत असताना भाजप सदस्य अल्पसंख्येने उपस्थित असल्याने जयंत पाटील आणि अजित पवार यांनी ताशेरे ओढले असता आशीष शेलार यांनी महापालिकेत हा प्रस्ताव गेली 15 वर्षे येत होता. तेथे सत्ता कुणाची होती, असा सवाल केला. याला सुनील प्रभू यांनी सडेतोड उत्तर देताना तत्कालीन शिवसेना नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी हा प्रस्ताव महापालिकेत मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला, मात्र गेली पाच वर्षे भाजप सरकारने हा ठराव मंजूर करण्यास विलंब केल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. आता हा ठराव 24 तासांत आशीष शेलार यांनी मंजूर करून आणावा, असे आव्हान त्यांनी दिले.
























































