मुंबईकरांचा टोलमुक्त, सिग्नलमुक्त प्रवासमार्ग प्रगतीपथावर! आदित्य ठाकरे यांच्याकडून कोस्टल रोड कामाचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरू असून आतापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामाची डिसेंबर 2022 ची डेडलाइन पाळली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा टोलमुक्त आणि सिग्नलमुक्त प्रवास लवकरच सुरू होईल असा विश्वास आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांनी आज कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

मुंबईला वेगवान बनवणार्‍या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम सध्या वेगात सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.97 किमीच्या मार्गासाठी एक हजार कर्मचारी-कामगार-अधिकारी यांच्यासह अत्याधुनिक मशनरीच्या माध्यमातून काम केले जात आहे. विशेष म्हणजे कोरोना काळ, निसर्ग चक्रीवादळाचा धोका असतानाही आवश्यक खबरदारी घेऊन काम सुरू ठेवल्याने 20 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लव ग्रोव्ह नाल्यावर बांधण्यात येणार्‍या पुलाच्या कामाचीही पाहणी केली.

पर्यावरणपुरक काँक्रिट प्लांट

कोस्टल रोडच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर काँक्रिट मिश्रणाची गरज लागत आहे. मात्र हे मिश्रण बनवत असताना आवाज, उडणारे सिमेंट, मशीनचा धूर आणि हवेत धूळ उडाल्याने प्रदूषणाचा धोका होता. मात्र हे टाळण्यासाठी वरळी येथे पर्यावरणपूरक आच्छादित काँक्रिट प्लांट बनवण्यात आले आहेत. यामुळे धूळ, धूर आणि आवाज यापासून परिसरातील नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

वेगवान प्रवासासोबत ग्रीन स्पेस मिळणार

कोस्टल रोडमुळे वेगवान प्रवासासोबत ग्रीन स्पेसही वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना हिरव्यागार मोकळ्या जमिनींचा आनंद घेता येईल. नागरिकांना टोलमुक्त, सिग्नलमुक्त आणि कोणताही कर न आकारता प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे कोस्टल रोड मुंबईकरांसाठी वरदानच ठरणार असल्याचे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

असा होणार फायदा

कोस्टल रोडमुळे प्रिंन्सेस स्ट्रिट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्र्यापर्यंतचा 9.98 किमीचा प्रवास मुंबईकरांना टोल-फ्री रस्त्यावरून सुस्साट करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे. कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या