
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण आटोक्यात आली असून एकूण 34 हजार ऑक्टिव्ह असताना केवळ दोन टक्केच रुग्ण बेडवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांत 25 ते 50 बेडचा एकच कोरोना वॉर्ड सुरू ठेवा, असे निर्देश रुग्णालय प्रशासनांना देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दोन भयंकर लाटा तर एक तिसरी सौम्य लाट आली. तिसऱया लाटेत विक्रमी रुग्णसंख्या नोंद झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी होते. सद्यस्थितीत दररोज 30 ते 40 हजार चाचण्या होत असताना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण 0.6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे पालिकेने तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्टिव्ह केलेल्या 34 हजार बेडपैकी हजारो बेड सध्या रिक्त आहेत.
दहापैकी चार जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्ण
कोरोनाच्या पहिल्या इतक्या भयंकर होत्या की, पालिकेने दहा जम्बो कोविड सेंटर सुरू केली. यावेळी रुग्णालयांसह जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण एक लाख बेडची तयारी पालिकेने केली होती, मात्र आता बेडवर रुग्ण नसल्याने नेस्को गोरेगाव – फेज 1, मुलुंड कोविड सेंटर, बीकेसी आणि रिचर्डसन अॅण्ड क्रुडास-भायखळा ही जम्बो कोविड सेंटर सुरू आहेत. तर इतर सेंटर बंद करण्यात आली नसली तरी या ठिकाणी एकही रुग्ण नाही.
नॉन कोविड रुग्णांची गैरसोय टळणार
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये पालिकेच्या रुग्णालयांसह दहा जम्बो कोविड सेंटर, 157 खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले.
मात्र सद्यस्थितीत मुंबईत केवळ 2115 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 1816 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. फक्त 96 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत.
त्यामुळे ऑक्टिव्ह बेड आता नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे नॉन कोविड रुग्णांची गैरसोय टळणार आहे.


























































