
वाढणाऱया कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने वेगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण होणार आहे. पालिकेच्या 10 लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण होईल. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. 31 मेपर्यंत लसीकरणाच्या तीन टप्प्यांतील 40 लाखांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेने वेगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.a
मुंबईत पूर्ण आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिकेने खबरदारी आणि लसीकरण वेगाने करून कोरोनाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. 16 जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यातील प्रंटलाइन वर्कर आणि तिसऱया टप्प्यातील 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असणारे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. या तिन्ही गटांत मिळून 40 लाख नागरिकांचे लसीकरण 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. या सद्यस्थितीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लसीकरण केले जात असून दररोज 40 ते 45 हजार जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता दोन शिफ्टमध्ये लसीकरण केले जाणार आहे.
टार्गेट दिवसाला एक लाख
सद्यस्थितीत व्यवस्था असणाऱया खासगी रुग्णालयांना 24 तास लसीकरणाची परवानगी पालिकेने दिली असून आता पालिकेच्या 10 खासगी रुग्णालयांत दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या पालिका आणि खासगी अशा 108 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मुंबईत दिवसाला एक लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यासाठी आगामी काळात केंद्राच्या परवानगीनंतर केंद्रांची संख्याही वाढवली जाणार आहे.
दोन दिवसांत कांजुरमार्गचे कोल्ड स्टोरेज सेंटर सुरू
सद्यस्थितीत एफ/दक्षिण परळ वॉर्डमधील कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसींचे डोस साठवण्यात येत आहेत. आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार असल्यामुळे कांजुरमार्ग येथील पालिकेच्या भव्य कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसी साठवण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत यासाठी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. पालिकेकडे सध्या कोरोना लसीचे दीड लाख डोस असून उद्या आणखी सवादोन लाख डोस येणार आहेत. त्यामुळे लसीच्या डोसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.































































