विक्रोळीत महिला पोलिसाचा विनयभंग, पार्कसाईट पोलिसांकडून दोघा अल्पवयीन मुलांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळी पश्चिमेकडे एका अल्पवयीन मुलाने पायी चाललेल्या पोलीस अंमलदार महिलेचा भररस्त्यात विनयभंग केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करून गैरकृत्य करणाऱ्या त्या मुलासह अन्य दोघांवर कारवाई केली आहे.

शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार महिला त्यांची मैत्रीण व चुलत भावासोबत पार्कसाईट येथील सिप्ला पंपनीसमोरून चालत जात होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या मुलाने त्या महिला अंमलदाराचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या गडबडल्या, पण तिघांनी मिळून त्या मुलाला पकडले. त्याचवेळी तेथून दुचाकीवरून जाणारे दोन तरुण त्यांच्याजवळ गेले. त्या तरुणांनी त्या मुलाला मारले व तेथून जाण्यास सांगितले. दरम्यान, त्यानंतर अंमलदार महिलेने पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून  घडल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. उपायुक्त पुरुषोत्तम कराड व वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंमलदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या मुलाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.  त्यानुसार पोलीस पथकांनी तत्काळ शोधमोहीम राबवून विनयभंग करणाऱ्या त्या मुलाला पकडले. तसेच त्या मुलाला पळवून लावणाऱ्या अन्य अल्पवयीन मुलासह तरुणावर करवाई करण्यात आल्याचे कराड यांनी सांगितले.

हा प्रकार कळताच पार्कसाईट परिसरातील काही नागरीकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर जमाव करत आरोपीला पकडून त्याच्यावर  कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून आरोपीला पकडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर नागरिक तेथून निघून गेले.