निर्धार टेट्रा पॅकमुक्त मुंबईचा! वरळीमधील लता पाटील यांचा पुढाकार

सुगंधित दूध किंवा फळांचा ज्यूस पिऊन झाल्यानंतर कसलाही विचार न करता आपण टेट्रा पॅक सरळ कचऱयाच्या डब्यात फेकून देतो. टेट्रा पॅकचे वर्षानुवर्षे विघटन होत नसल्याने हा कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये तसाच पडून राहतो.  पालिकेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरते. टेट्रा पॅकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरळीमधील लता पाटील या स्वयंसेविका गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. दरमहा मुंबई आणि परिसरातून त्या साधारण 50 ते 60 टन टेट्रा पॅकचे संकलन करतात. विशेष म्हणजे टेट्रा पॅकच्या पुनर्वापरातून तयार केलेल्या फर्निचर, बेंच, स्टूल आदी वस्तू एका संस्थेच्या मदतीने त्या पुन्हा शाळा, सोसायटय़ांपर्यंत मोफत पोहोचवतात.

घनकचरा व्यवस्थापनावर काम करण्याऱया संपूर्ण ई-अर्थ या कंपनीत लता पाटील नोकरीला आहेत. 2006 सालापासून त्या टेट्रा पॅक संकलन करण्याचे काम करीत आहेत. या उपक्रमाबाबत त्या म्हणाल्या, विविध शीतपेये टेट्रा पॅकमधून सर्रास विकली जातात. वापरानंतर ही पॅकेटस् कचऱयात फेकतात. ही पॅकेटस् भंगारवाले विकत घेत नाहीत. त्यामुळे कचरावेचक त्या गोळा करत नाहीत. टेट्रा पॅकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला. पुढे त्या म्हणाल्या, अॅल्युमिनिअम, कागद आणि प्लॅस्टिकच्या मिश्रणातून टेट्रा पॅक तयार होतात. त्याचे विघटन होत नसले तरी त्याच्यापासून अनेक वस्तू तयार होतात. याबाबत आम्ही ‘आरयूआर’ या संस्थेच्या मदतीने शाळा, सोसायटय़ांमध्ये जाऊन जनजागृती केली. आमच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुंबई आणि परिसरच नाही तर अगदी पालनपूरमधूनदेखील आम्हाला टेट्रा पॅक संकलन करण्यासाठी बोलावले जाते.

जमा केलेले टेट्रा पॅक भांडुपला नेऊन तेथे बेलिंग मशीनवर त्याचे गठ्ठे बांधले जातात. मग हे गठ्ठे पालघर येथील डिलक्स या पंपनीला दिले जातात. ही पंपनी त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू तयार  करते. यामुळे पर्यावरणाची हानी टळते आणि कचऱयाचा प्रश्नदेखील मार्गी लागतो, असे लता पाटील सांगतात.