
सामना प्रतिनिधी। मुंबई
दिल्लीहून मुंबईला येऊन घरफोडय़ा करणाऱया टोळीचा गोरेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. दुर्गेश चौबे, आकाश माथूर, अजय चव्हाण, परवीन सिंग आणि करण कनोजिया अशी या पाच जणांची नावे असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
गोरेगाव पश्चिम येथे गजानन कॉलनीबाहेर गुरुवारी रात्री तीन जण संशयास्पद फिरत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशाने गोरेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन गचे आणि संदीप पाचगने यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांना कळवली. परिमंडळ-11 चे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त राजाराम मांडगे, वरिष्ठ निरीक्षक संजीव भोळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गचे, संदीप पाचगने, पोलीस हवालदार कर्पे, लोणारे, ढोक, जाधव, लोटणकर यांचे पथक तेथे गेले. इमारतीच्या चारही बाजूने पोलीस तैनात केले. आरोपीच्या अटकेकरिता पोलिसांनी 9 बिल्डिंग शोधल्या. अखेर एका बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीखालील जागेत तीन जण लपून बसले होते. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन घरफोडीकरिता लागणारे साहित्य आणि साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. त्या तिघांच्या चौकशीत दोघांची नावे समोर आली. पाचही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
…आणि तो घरफोडय़ा करू लागला
दुर्गेश हा मूळचा दिल्लीचा रहिवासी असून दिल्लीमध्ये तो दारूचा धंदा करायचा, मात्र दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केल्यावर तो घरफोडय़ा करायला लागला. त्याच्या विरोधात दहा तर आकाशविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. तुरुंगात असताना दुर्गेशची आकाशसोबत ओळख झाली होती.
सुरतमध्ये केली घरफोडी
दुर्गेश मुख्य सूत्रधार आहे. ही टोळी दिल्लीहून ट्रेनने मुंबईमध्ये आली होती. नागपाडा परिसरात एका लॉजमध्ये ते राहत होते. मुंबईमध्ये येण्यापूर्वी या टोळीने सुरतमध्ये घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ज्या सोसायटय़ांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा सोसायटीचे ते रेकी करत असायचे.


























































