
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगात सुरू असून नालेसफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना 28 मेपर्यंत 97.13 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन दिवसांपूर्वीच 3 हजार किमी लांबीच्या छोटय़ा नाल्यांमधील गाळ काढून झाला आहे. तर 31 मेपर्यंत नालेसफाईचे शिल्लक कामही पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिका पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारे नालेसफाईचे काम यावर्षी उशिरा सुरू झाले. 7 मार्च रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्याने नालेसफाईचे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले होते. मात्र पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी प्रस्तावांना मंजुरी दिल्याने 11 एप्रिलला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावर्षी नालेसफाई उशिरा सुरू झाल्यामुळे कंत्राटदारांवर तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी सर्व सातही परिमंडळात भरारी पथक आणि नागरिकांच्या माहिती मिळावी-तक्रार करता यावी यासाठी ‘डॅशबोर्ड’ही सुरू करण्यात आला आहे. तर कंत्राटदारांना नालेसफाईच्या कामाचा मोबदला देताना डंपिंग ग्राऊंडवर गाळ टाकतानाचे वजन करून त्यानुसारच पैसे देण्यात येणार आहेत. नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱया शहर विभागातील कंत्राटदाराला साडेतीन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. परिणामी यावर्षी कमी वेळात नालेसफाईचे टार्गेट गाठण्यात यश येत आहे.
नालेसफाईच्या कामाची टक्केवारी
मुंबई शहर: 93.31 टक्के
पूर्व उपनगर: 98.36 टक्के
पश्चिम उपनगर: 93.51 टक्के
छोटे नाले: 100 टक्के
मिठी नदी: 95.38 टक्के
असे झाले काम
संपूर्ण मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले, पावसाळी गटारे आणि मिठी नदीमधून यावर्षी 31 मेपर्यंत 910957.684 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील 888482.05 मेट्रिक टन म्हणजेच उद्दिष्टांपैकी 97.31 टक्के गाळ 28 मेपर्यंत काढण्यात आला आहे.


























































