मुंबई अग्निशमन दल जवानांच्या शौर्याला सलाम, कस्तुरबातील वायू गळतीत वाचवले रुग्णांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या वायू गळती वेळी प्रसंगावधान राखून रुग्ण, कर्मचारी, रहिवाशी, दुकानदार यांचे प्राण वाचवल्याबद्दल मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना शौर्य पदक तर चार जवानांना विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते आज नागपूरमधील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात हा समारंभ झाला.

हे आहेत शौर्य, सेवा पदकाचे मानकरी
विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगावकर, वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल विश्वासराव, केंद्र अधिकारी दीपक जाधव, केंद्र अधिकारी सागर खोपडे, प्रमुख अग्निशामक संजय गायकवाड, अग्निशामक संजय निकम, अग्निशामक गणेश चौधरी या सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक तर विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कराडे, प्रमुख अग्निशामक दत्तात्रय पाटील, यंत्रचालक संदीप गवळी, सहाय्यक कार्यदेशक गुरुप्रसाद सावंत यांना अग्निशमन सेवा पदक बहाल करण्यात आले आहे.

राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त सेवानिवृत्त उपआयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, सेवानिवृत्त प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी आत्माराम मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी कृष्णात यादव यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.