बुडणाऱ्यांना वाचवणार अग्निशमन दलाचा ड्रोन! आगही विझवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र भगत । मुंबई

मुंबईतील चौपाट्यांवर बुडणाऱ्यांना वाचवण्याचे काम पालिकेच्या अग्निशमन दलाचा ड्रोन करणार आहे. या ड्रोनचा वापर आग विझवण्याच्या कामातही करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्घटनांमधील जीवित-वित्तहानी टळण्यास मदत होणार आहे. या ड्रोनची टेक्निकल टेस्ट अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत आगी लागण्याच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणा सुरू करण्यात येत आहेत. अशा दुर्घटनांच्या ठिकाणी बचावकार्य पोहोचण्यास अनेक वेळा दाटीवाटीची बांधकामे, दूरचे अंतर आणि नैसर्गिक अडथळे येत असल्यामुळे जीवित-वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अग्निशमन दलात अत्याधुनिक ड्रोन आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार तीन कंपन्यांकडून प्रेझेंटेशन मागवून अग्निशमन दलाच्या आवश्यकतेनुसार टेक्निकल टेस्ट करण्यात येत आहे. यामध्ये बचावकार्य करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणाऱया ड्रोनची निवड अग्निशमन दलाकडून करण्यात येणार आहे. या ड्रोनच्या वापरासाठी पोलीस आणि नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या एनओसीनंतर वापराचा मार्ग मोकळा होईल.

असे चालणार ड्रोनचे काम

  • अनेक वेळा खोल समुद्रात गेलेले पर्यटक बुडताना दिसतात. काही वेळा त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहोचण्यास वेळ लागल्याने जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून बुडणाऱया व्यक्तीपर्यंत लाइफ जॅकेट, रोप वेगाने पोहोचवला जाणार आहे.
  • शिवाय भडकलेल्या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान जाऊ न शकणाऱया ठिकाणी ड्रोन जाऊन तिथल्या स्थितीचे फोटो पाठवू शकणार आहे. शिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कामही करू शकणार आहे.

आगीसारख्या अनेक दुर्घटनांमध्ये प्रत्यक्ष ठिकाणी प्रवेश करणे जवानांच्या जिवाला धोकादायक ठरू शकते. अशा ठिकाणी ड्रोन, रोबोट पोहोचून बचावकार्य करू शकणार आहेत. शिवाय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मिळालेली माहिती आणि फोटोमुळे बचावकार्य वेगाने, नियोजनबद्धरीतीने करणे सोयीचे ठरणार आहे. – डॉ. प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दलप्रमुख

एप्रिलपर्यंत रोबोटही दाखल होणार
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलात लवकरच अत्याधुनिक रोबोटही आणण्यात येणार आहे. सिपिक कंपनीकडून हे रोबोट घेण्यात येणार आहेत. यामध्ये दुर्घटनेची माहिती देण्यापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम या रोबोटकडून केले जाणार आहे. एप्रिलपर्यंत हे रोबोट अग्निशमन दलात दाखल होतील अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाकडून देण्यात आली.