कुर्ल्यातील एसआरए इमारतीला आग, गुदमरल्याने वृद्धेचा मृत्यू; 12 जण रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला येथील प्रीमिअर कंपाऊंडमधील प्रगती सोसायटी या एसआरए इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत धुराने गुदमरून 70 वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला तर 12 जणांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. आगीदरम्यान जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीत अडकून पडलेल्या 25 जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली.

कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी, प्रीमिअर कंपाऊंडमध्ये एसआरएच्या 10 ते 12 इमारती असून यातील प्रगती सोसायटी या 12 मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याला सकाळी 7च्या सुमाराला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने थोडय़ा वेळातच भीषण रूप धारण केले आणि ही आग 10व्या मजल्यापर्यंत पसरली. आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले. त्यामुळे चौथ्या ते दहाव्या मजल्यावरील रहिवाशी गुदरमले. जीव वाचवण्यासाठी या रहिवाशांनी गच्चीवर धाव घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने पोहोचत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. चार पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्याचबरोबर गच्चीवर अडकलेल्या 25 रहिवाशांची सुखरूप सुटका केली. दुर्दैवाने या घटनेत 70 वर्षांच्या शपुंतला रामाणे यांचा धुरात गुदमरल्याने मृत्यू झाला तर 12 जणांना श्वसनाच्या त्रासामुळे   उपचारांसाठी घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

इतर जखमी   

दगडू जाधव  (69), अलका जाधव (65), दिनेश जाधव (33), राहुल बलराज (75), सचिन बलराज (29), फातिमा शेख  (52), भारती वाघमारे (23), संगीता गायकवाड (54),  दयानंद गायकवाड (59),

शिवसेनेचे मदतकार्य 

आगीच्या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, सहसंघटक नरेश माटे, माजी शाखाप्रमुख सुधाकर पाटील, युवासेनेचे अजिंक्य वाणी, सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर हे मदतकार्यात सहभागी झाले. त्याचबरोबर रुग्णालयात प्रत्येकाला सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

रामाणे कुटुंबीयांवर शोककळा

रामाणे कुटुंबीय 9 वर्षांपूर्वी कुर्ला पूर्व येथे राहत होते. पाईपलाईनजवळ असलेल्या या कुटुंबाला रस्ता रुंदीकरणामुळे प्रकल्पग्रस्त ठरवत कुर्ला पश्चिममधील प्रगती सोसायटी या एसआरएच्या इमारतीत जागा मिळाली. मात्र दुर्दैवाने आज लागलेल्या आगीत शपुंतला रामाणे यांचा मृत्यू झाला. शकुंतला रामाणे यांचे पती शिवराम रामाणे (74), मुलगा प्रदीप रामाणे (54) आणि नातू विनायक रामाणे (28) यांना धुरामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.