
मुंबई-गोवा महामार्गावरून बेकायदेशीररित्या गुटख्याची तस्करी करणाऱ्याला मुद्देमालासह दादर सागरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील यांना मुंबई-गोवा महामार्गावर गुटख्याची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील यांच्यासह एस.जी.पाटील, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, पोलीस नाईक म्हात्रे यांच्या पथकाने आंबिवली फाटा नजिक हॉटेल गार्डन फुड अँड स्नॅक्स जवळ सापळा रचला.
मुंबई-गोवा हायवेवरून मुंबईकडून पेणकडे आयशर टेम्पोला (क्र. एमएच 43 बीजी 0719) पोलिसांनी अडवले. या टेम्पोमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पानमसाला आढळून आला. गुटखा आणि टेम्पो पोलिसांनी जप्त केला जप्त केला असून टेम्पो चालक गुफरान फौजदार खान (वय – 26, रा. डुडोवा नवावा, ता. तिलोही पो. पिडी जि. अमेठी, उत्तरप्रदेश) याला गजाआड केले आहे.




























































