महावितरणचे ऑनलाइन कलेक्शन जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

महावितरणचे ऑनलाइन कलेक्शन जोरात सुरू आहे. ग्राहकांना विजेचे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून महावितरणने सुरू केलेल्या ऑनलाइन आणि मोबाईल ऍपच्या सेवेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक महिन्याला राज्यातील तब्बल 46 लाख वीज ग्राहक प्रत्येक महिन्याला ऑनलाइन आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून 1100 कोटी रुपयांचे वीज बिल भरतात. त्यामुळे कोणत्याही कलेक्शन कमिशन शिवाय महावितरणच्या तिजोरीत बिल जमा होत आहे. यामध्ये पुणे आणि कोकण विभाग आघाडीवर आहे.

महावितरणचे राज्यात दोन कोटी 24 लाख औद्योगिक, घरगुती आणि वाणिज्यक ग्राहक आहेत. वीज बिलाची रक्कम महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर किंवा खासगी बिल भरणा केंद्रावर भरण्यासाठी भल्या मोठय़ा रांगा असतात. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते, त्याची दखल घेत महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ऍपवर वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नागपूर विभागातील 47 लाख ग्राहकांपैकी 7 लाख ग्राहक ऑनलाइन बिल भरतात. पुणे विभागात 61 लाख ग्राहकांपैकी साडेचौदा लाख, कोकण विभागातील 90 लाख ग्राहकांपैकी 21 लाख ग्राहक थेट ऑनलाइनच्या माध्यमातून वीज बिलाची रक्कम भरतात.