Maratha Reservation Row – गाडीची तोडफोड झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची आज सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. लवकरात लवकर एखादं अधिवेशन बोलावून या मागणीविषयी चर्चा व्हावी यासाठी सर्व आमदारांची भावना असल्याचे मंत्री हसन मुश्रीफांनी सांगितले. तसेच ज्यांनी आपल्या गाडीची तोडफोड केली त्यांना सोडून देण्यात यावं अशी विनंती ते गृहखात्याला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास आकाशवाणी आमदार निवासाच्या परिसरात उभी असलेली त्यांची गाडी फोडण्यात आली. यानंतर हसन मुश्रीम यांनी माध्यमांना प्रतिकिया दिली. त्यावेळी ते म्हणाले, ”सकाळी मला कळलं की, माझ्या गाडीच्या काचा फोडल्या. आपल्याला सर्वांनाच माहित आहे सध्याचे वातावरण काय आहे ते. या घटनेनंतर माझ्या मतदारसंघातले, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे राज्यभरातून फोन येत आहेत. मी गाडीमध्ये नव्हतो, मी सुखरुप आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. हे जे कृत्य झाले आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यामुळे त्यांच्या ज्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी गृहखात्याला विनंती करणार आहे”.

पुढे ते म्हणाले, कालच आमची मंत्री मंडळाची बैठक झाली. अहिंसेच्या मार्गातून हे आंदोलन व्हायला हवे, या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. आमदारांची घरं जाळणं, त्यांचे घरात कुटुंब असताना असे कृत्य करणं हे फार दुर्देव आहे. अशाप्रकारच्या घटना अजिबातच होता कामा नये. त्यामुळे या आंदोलनाला गालबोट लागते. जी सहानभुती वाटते ती अशाप्रकारच्या कृत्यांमुळे जाते. त्याचासुद्धा त्या तरुण आंदोलकांनी, त्यांच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. या आंदोलनाला नेतृत्व असं दिसत नाही. कुणीतरी त्यांना समजावून सांगावे की कशाप्रकारे आंदोलन असावे, कशाप्रकारे त्याला दिशा असावी. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत आहेत.

टार्गेट करून स्थानिक विरोधक अशा घटना घडवून आणत आहेत की काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे. आमदार स्वत:ची घरं जाळतील, गाड्या जाळतील असं होईल का? स्थानिक पातळीच्या राजकारणाशिवाय हे होऊच शकत नाही. त्यामुळे या घटना कोण घडवून आणतंय ते बघणं गरजेचं आहे, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.