दादा कोंडकेंच्या 12 चित्रपटाच्या प्रिंट ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ला देण्याचे आदेश

उभ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारे दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या प्रिंट एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एलएलपीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई(बॉम्बे) फिल्म एंटरप्रायझेस आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला हे आदेश देण्यात आले आहे. न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी 20 जुलै रोजी हे आदेश पारीत केले. हायकोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दादा कोंडके यांच्या 12 चित्रपटांच्या निगेटीव्ह आणि पॉझिटीव्ह प्रिंट या एव्हरेस्ट कंपनीच्या ताब्यात देण्यात याव्यात. एव्हरेस्ट कंपनीने हायकोर्टात दादा कोंडके यांच्या चित्रपटांची अधिकृत मालकी आपल्याला जाहीर करण्यात यावी आणि या चित्रपटांचे सर्वाधिकारही आपल्याला मिळावेत यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेदरम्यान एव्हरेस्टने या 12 चित्रपटांसाठी अंतरीम अर्ज दाखल केला होता.

दादा कोंडके यांची बहीण लीलाबाई मोरे यांची सून माणिक मोरे यांच्या नावे दादा कोंडके यांनी त्यांच्या इच्छापत्रात या चित्रपटांचे अधिकार दिले होते. त्यांच्याकडून हे अधिकार आपल्याला मिळाल्याचे एव्हरेस्ट कंपनीचे म्हणणे आहे. दादा कोंडके यांचे 14 मार्च 1998 रोजी निधन झाले होते. त्यांनी तीनबॅनरखाली चित्रपटांची निर्मिती केली होती. माणिक मोरे यांच्याकडे दादा कोंडके यांच्या 12 चित्रपटांचे सर्वाधिकार होते. या चित्रपटांमध्ये सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडी हवालदार, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आलं अगावर, सासरचे धोतर , मुका घ्या मुका आणि अंधेरी रात मे दिया तेरे हात मे या चित्रपटांचा समावेश आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने अंतरीम अर्ज दाखल करण्यामागे कारण होतं ते म्हणजे शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानच्या दोन ट्रस्टींनी चित्रपटांवर केलेला दावा. हृदयनाथ कडू-देशमुख आणि अभिनेत्री उषा चव्हाण यांनी या चित्रपटांवर आपला अधिकार सांगितला होता. हायकोर्टाने युक्तिवादाने ऐकल्यानंतर आदेश देताना म्हटले की प्राथमिक दृष्ट्या असे दिसत आहे की या चित्रपटांचे हक्क हे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट कंपनीकडे आहेत.