
26 वर्षांपूर्वी लोकल प्रवासात चोरीला गेलेली सोन्याची चैन महिलेला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी परत केली. सोन्याची चैन परत मिळाल्याने महिलेने पोलिसांचे कौतुक केले.
वसई येथे राहणाऱया पिंकी सुनील डिकूना या 1994 साली कामानिमित्त चर्चगेट येथे आल्या होत्या. लोकलची वाट पाहत असताना चोरटय़ाने त्याची 7 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून पळ काढला. चोरी प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी मोहंमद निजाम नासिरला बेडय़ा ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली चैन जप्त केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई सेंट्रल रेल्के पोलिसांनी पिंकीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिच्या जुन्या पत्यावर पोलीस गेले. मात्र त्या तिथे राहत नव्हत्या. भावाकडून माहिती घेत पोलीस पिंकीपर्यंत पोहोचून तिची चैन परत केल्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.
चार महिन्यात 1250 जणांना केला मुद्देमाल परत
रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी विविध गुह्यातील मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मार्च ते जुलै या काळात रेल्वे पोलिसांनी 1250 जणांना मुद्देमाल परत केला. यात 1983, 1986 आणि 1988 साली चोरीला गेलेल्या दागिन्यांचा समावेश आहे.
390 जणांचे मोबाईल केले परत
लॉक डाऊन काळात रेल्वे पोलिसांनी 390 जणांना त्याचे हरवलेले मोबाईल परत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलिसांनी 72, वांद्रे रेल्वे पोलिसांनी 44, वसई रेल्वे पोलिसांनी 101, कुर्ला 27, कल्याण रेल्के पोलिसांनी 21 जणांचे मोबाईल परत केल्याची नोंद आहे.





























































