एसटीच्या पूर्णक्षमता वाहतुकीला संमिश्र प्रतिसाद, मुंबईत येणाऱ्या नोकरदार वर्गाला मात्र फायदा

एसटी महामंडळाने आपल्या बसेस संपूर्ण शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या बसेस फायदा मात्र विरार, पनवेल आणि बदलापूरसारख्या ठिकाणाहून मुंबईत नोकरीसाठी येणाऱया सर्कसामान्यांना होणार आहे.

एसटीच्या लांबपल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस या पूर्वीप्रमाणेच सर्व प्रवासी भरून चालविण्याचा निर्णय गुरुवारी एसटी प्रशासनाने घेतला आहे. एसटीला कोरोना काळात प्रवासी उत्पन्न बुडाल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीचा पगार देण्याइतपतही उत्पन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या एसटीचे इतर वेळी दिवसाचे उत्पन्न 20 ते 22 कोटी रूपये असताना एसटीला सध्या साडेतीन कोटी रूपये उत्पन्न मिळत आहे. त्यातच 50 टक्के प्रवासी क्षमतेने गाडय़ा चालविण्यात येत असल्याने अर्ध्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागत आहे. त्यामुळे एसटीने गुरुवारपासून पूर्वीप्रमाणेच शंभर टक्के प्रवासी क्षमतेने एसटी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास पहिल्याच दिवशी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी प्रवासी वाढले तर काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळाला आहे.

लोकलची दारे बंद असल्याने एसटीला गर्दी

लोकलची दारे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असल्याने एसटीने मुंबईत नोकरीसाठी येणाऱयांची संख्या प्रचंड वाढली आहे. शंभर टक्के प्रवासी क्षमतेने एसटी चालविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने अशा नोकरवर्गाला फायदा झाला आहे. पनवेल येथून एसटीच्या दादर,वाशी, मानखुर्द, कालीना, प्रभादेवी, करीरोड, सीएसएमटी, फोर्ट, भायखळा, वांद्रे अशा 281 फेऱया चालविण्यात येत आहेत. विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर येथून 407 फेऱया, शहापूर, बदलापूर, टिटवाळा, कळवा येथून 356 फेऱया चालविण्यात येत आहेत. त्यांची गर्दी शंभर टक्के प्रवासी क्षमतेच्या नव्या नियमांमुळे वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या