
काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख याना गँगस्टर गोल्डी ब्रारने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. येत्या दोन दिवसांत अस्लम शेख यांना गोळय़ा झाडून हत्या करणार असल्याची त्याने धमकी दिली. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गोल्डी ब्रार हा गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या गँगशी संबंधित आहे.
गेल्या काही दिवसापासून गुंड लॉरेन्स बिष्णोई गँगकडून बॉलीवूडच्या कलाकारांना धमकी देण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता गोल्डी ब्रारने काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
विक्रम कपूर हे शेख यांचे स्वीय सहाय्यक आहेत. शेख यांच्या मोबाईलवर येणारे फोन कपूर हे उचलतात. त्यानंतर आलेल्या फोनची माहिती शेख यांना दिली जाते. गेल्या आठवडय़ात कपूर हे पालिकेच्या ‘पी’ नॉर्थ कार्यालयात गेले होते. तेव्हा शेख यांच्या मोबाईलवर तीन फोन आले. फोन करणाऱ्याने तो गोल्डी ब्रार बोलत असल्याचे सांगितले. आपण अस्लम शेख यांना गोळय़ा झाडून ठार मारणार आहोत. याची माहिती शेख यांना द्यावी असे गोल्डीने फोनवर सांगितले. त्यानंतर कपूर याने याची माहिती शेख यांना दिली. याप्रकरणी कपूर याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. कपूर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.






























































