
दुकानाच्या पाठीमागे सोसायटीच्या सामायिक जागेत पावसाळी शेड बांधण्यास परवानगी देण्यासाठी दोन लाखांची मागणी करून तडजोडीअंती एक लाख 90 हजार रुपये स्वीकारताना पालिकेचे सहाय्यक व दुय्यम अभियंता ट्रप झाले.
किरण (नाव बदललेले) यांचे ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे सोसायटीच्या सामायिक जागेमध्ये त्यांना पावसाळी शेड बांधायची असल्याने त्यासाठी किरण यांनी पालिकेच्या डी विभागात कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात विचारणा केली. तेव्हा दुय्यम अभियंता दत्तात्रय माने (36) यांनी किरण यांच्याकडे परवानगीसाठी दोन लाखांची मागणी केली, परंतु लाच द्यायची नसल्याने किरण यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिली. दरम्यान त्यानंतर किरण यांनी एका पंचासमक्ष सहाय्यक अभियंता अमोल थवील (39) व माने यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा दोघांनीही पावसाळी शेड बांधण्यास परवानगी देण्यासाठी दोन लाखांची मागणी केली. त्यावेळी किरण यांनी केलेल्या तडजोडी अंती एक लाख 90 हजार रुपये द्यायचे ठरले. ठरल्याप्रमाणे किरण एक लाख 90 हजारांची रोकड घेऊन कार्यकारी अभियंता कार्यालयात देण्यासाठी गेल्यानंतर ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून दत्तात्रय माने यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर किरण यांची एका पंचासमक्ष थवील यांची भेट घेतली असता माने यांनी दोघांच्या वतीने पैसे घेतले असल्याची सहमती दर्शविल्यानंतर ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांनाही ताब्यात घेतले.
थवील यांच्या कार्यालयात 17 लाखांची रोकड
ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने दोन पंचांसमक्ष थवील यांच्या कार्यालयाची झडती घेतली. त्यावेळी कार्यालयातील टेबलाच्या डाव्या बाजूकडील ड्रॉव्हरमध्ये 17 लाख 64 हजार 500 रुपयांची रोकड मिळून आली. या रकमेबाबत थवील यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळू न शकल्याने ती रोकड पुढील तपासकामी ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेतली.





























































