नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास ऑगस्ट 2024 पर्यंत सहन करा! मंत्र्यांचे लेखी उत्तर

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीची योग्य नियोजन नसणे, जागोजागी पडलेले खड्डे यामुळे रोज वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. गेले अनेक महिने या मार्गावर ही समस्या असून या समस्येचा लोकप्रतिनिधींनाही फटका बसला आहे. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीदेखील आपण या कोंडीत सापडलो होतो, आणि या कोंडीमुळे आपल्याला 2 किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागले होते असं सांगत सरकारला धारेवर धरलं. थोरात यांनी विधानसभेत म्हटले की, एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. मला या प्रवासात ॲम्बुलन्सदेखील वाहतूक कोंडीत अडकलेल्या दिसल्या. यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की ऑगस्ट 2024 पर्यंत या मार्गावरील ही समस्या कायम राहणार आहे. असं चालणार नाही, तुम्ही याबाबत काहीतरी केलं पाहिजे असे थोरात यांनी म्हटले. तडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.

नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री उत्तर देताना म्हणतात की, ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल. हे अत्यंत असंवेदनशील उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा असे थोरात यांनी म्हटले. मुंबई नाशिक महामार्गाचा वापर करून जळगाव, धुळे, नगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पोहोचता येतं. थोरात यांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरल्यामुळे सरकारतर्फे सांगण्यात आले की ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या करू. आठवडाभरात तुम्हाला किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल.